‘समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी २०१८’चे आयोजन  

 

ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे

 चिपळूण : पूर्ण क्षमतेने बारमाही वाहणाऱ्या, कोकणातील चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या पर्यटन कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने दिनांक ४ ते ८ मे २०१८ दरम्यान ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असून या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील पर्यटन समृद्धीचा सुगंध सर्वदूर पसरावा हा उद्देश या मागे आहे.  

      सन २०१४ पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जात असून किमान सुमारे २५ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती यास लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा, असा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. ‘क्रोकोडाईल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात आली असून त्यांसोबत आयलंड भेट, डॅशिंग कार, अस्मानी झुले, रोइंग बोट, पॅडल बोटिंग, फनी गेम्स, फूड कोर्ट उपलब्ध असणार असून खाडीतील वातावरण पर्यटकांनी गजबजणार आहे.

कोकणच्या निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या, आपल्या उन्हाळी सुट्टीचे नियोजन करीत असलेल्या पर्यटनप्रेमींनी या वैशिष्ट्यपूर्ण सफारीचा लाभ घ्यावा, आपल्या पर्यटन सेवेची संधी द्यावी. चिपळूणचे वैभव अनुभवावे, गोवळकोट किल्ला, खाडीतील छोटी-छोटी बेटे पाहावीत.अधिक माहितीसाठी विश्वास पाटील मो नं. ९८२३१३८५२४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ संस्थेच्या वतीने करण्यात आहे.

 

No comments

Be the first one to leave a comment.

Post a Comment